राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभाग घेतला. महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातील वातावरण गुंतवणुकीसाठी अनुकूल नसल्याची खंत करुन गुंतवणूकदारांसाठी निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी सूचना केली. सरकार गुंतवणुकीचे आणि रोजगार निर्मितीचे जे आकडे देते त्यानुसार महाराष्ट्रात मागील तीन वर्षात ५० लाख रोजगार निर्माण होणे अपेक्षित होते पण रोजगाराऐवजी महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढते असा खोचक टोला त्यांनी लगावला.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या इकॉनॉमिक एडवायसरीने सांगितले, की महाराष्ट्राची पीछेहाट झाली असून महाराष्ट्र गुजरातच्या मागे पडत आहे. मग सरकारला तीन-तीन इंजिन लावून फायदा काय? एचएसआरपी नंबरप्लेटसाठी तिप्पट रक्कम महाराष्ट्राकडून वसूल केली जात आहे. ज्या तीन विविध कंपन्यांना कंत्राट दिले त्याच कंपन्या इतर राज्यात मात्र कमी दरात काम करतात. महाराष्ट्रात मात्र दर जास्त आहे हे सांगताना त्यांनी परिवहन विभागाच्या साक्षीनेच कोट्यवधींची लूट सुरु आहे, असा आरोप केला.
राज्यपाल महोदयांनी आपल्या भाषणाच्या शेवटच्या भागात मोलाचा विचार मांडताना शासन सर्व समाज घटकांना सोबत घेऊन, सर्वसमावेशक, प्रगतशील, पुरोगामी व विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी काम करणार आहे याकडे जयंत पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. तसेच दिल्ली येथे पार पडलेल्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात अध्यक्ष तारा भवाळकर यांनी मांडलेल्या विचारांचा दाखला देत वारकरी संतांनी सामाजिक समतेचं पहिलं मूल्य दिलं. संतांनी जातीभेदाला ठामपणे विरोध केला.
' जया म्हणती नीचवर्ण। स्त्रीशूद्रादी हिनजन॥1॥
सर्वांभूती देव वसे।नीचाठायी काय नसे॥2॥
असा रोखठोक सवाल एकनाथ महाराजांनी विचारला. ज्या स्त्रीशूद्रांना तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांच्या संकुचित संस्कृतीतून वगळलं त्यांची बाजू संतांनी लावून धरली. संत केवळ सामाजिक समतेचा विचार मांडूनही थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या परीने त्या काळात जितकं शक्य तितकं कार्य करण्याचाही प्रयत्न केला. पण याच महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मागासवर्गीय समाजातील एका मुलाला निर्घृणपणे मारण्यात आले असून महाराष्ट्रात निघृणपणे हत्या होत आहेत हे महाराष्ट्राला शोभणारे नाही. अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
#