चुकीचा सर्व्हे त्यानुसार वाढीव घरपट्टी रद्द करण्याबाबत आदेश काढू--उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांना आश्वासन

Admin
By -





              सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेला सर्वे व त्या आधारे आकारलेली घरपट्टी वाढ रद्द करण्यासंदर्भात आदेश काढू असे अश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांना दिले आहे.

              गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात कोअर प्रोजेक्ट अँड कन्सल्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीकडून ड्रोन द्वारे करण्यात आलेल्या सर्वेचा आधार घेत घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर, अवाजवी वाढ केल्याने महापालिका क्षेत्रातील विविध पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिकांमधून तीव्र विरोध होताना दिसत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी वारंवार आवाज उठवला आणि या घरपट्टी वाढीला तीव्र विरोध केला. काही दिवसांपूर्वीच झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्येही महेंद्र चंडाळे यांनी आपली प्रतिक्रिया मांडून आपण नागरिकांच्या भल्यासाठी त्यांच्याबरोबर राहणार असल्याची भूमिका स्पष्ट केली होती.

             या विषयासंदर्भात नुकतीच त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीचा सर्वे करून वाढवण्यात आलेल्या घरपट्टी संदर्भात तक्रार करत चर्चा करून सदर चुकीचा सर्वे व त्या आधारे आकारण्यात आलेली घरपट्टी वाढ ताबडतोब रद्द करण्यात यावी अशी मागणी केली.
             यावेळी सदर चुकीचा सर्वे करून त्याआधारे आकारण्यात आलेली घरपट्टी वाढ ताबडतोब रद्द करण्यात यावी या संदर्भात आपण आदेश काढू असे अश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी म्हटले आहे.