नागपूर गिट्टीखदान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. नागपूर शहर पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाने, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सत्यस्थिती विधानपरिषद उपसभापती कार्यालयातील अधिकाऱ्यांनी नागपूर पोलिसांकडून जाणून घेतली.
या प्रकरणाचा गिट्टीखदान पोलीस स्थानकात ६ डिसेंबर २०२४ रोजी नोंद झाला आहे. हे प्रकरण गंभीर आहे. याबाबत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तत्काळ दखल घेतली असून निवेदनाद्वारे विशेष सूचनाही दिलेल्या आहेत.
आरोपी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाची जामीन मंजूर होणार नाही याबाबत पोलीसांनी न्यायालयात प्रभावी युक्तीवाद करावा. या गुन्ह्याबाबत इतर पुरावे त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेज तपासणी पोलीसांनी करावी. तसेच, पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात यावी. पोलीस अहवालामध्ये पिडीतेचा जाब विचारून तज्ञ समुपदेशकडून सहकार्य मिळवून द्यावे. मनोधैर्य योजेनेअंतर्गत आवश्यक असे सहकार्य करावे.
भारतीय न्याय संहिता अंतर्गत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याकरीता न्यायालयास विनंती करावी. बालहक्क संरक्षण अधिनियम अंतर्गत अत्याचार झालेल्या पीडितेचे नाव समाजमाध्यमात येवू नये याची काळजी घ्यावी. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस उपआयुक्त दर्जाचा अधिकारी नेमावा. आरोपीविरूद्ध वस्तीतील इतर मुलींच्या काही तक्रारी असल्यास त्याचा शोध घ्यावा. अशा सूचना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर पोलीस आयुक्त यांना दिल्या आहेत.