काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांना केले आवाहन

Admin
By -
        




           गेली चार दशकं आम्ही शेरीनाल्याचं नाटक पाहतोय. अजून किती वर्षे तेच ते कॅसेट वाजवणार आहात. हे ढोंग आता थांबवा. सांगलीकरांच्या आरोग्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय. तातडीने नाल्यावरील पंप सुरु करा. कोयनेतून २१०० क्यूसेक पाणी सोडा आणि नदीपात्र स्वच्छ करा. अन्यथा, दोन दिवसांत रस्त्यावरची लढाई सुरु होईल, असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला.
           शेरीनाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याच्या प्रकाराबद्दल त्यांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी चर्चा केली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी शेरीनाल्याच्या ठिकाणी जावून पाहणी केली. या स्थितीत सांगलीत साथीचे आजार पसरले तर महापालिका जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला.
            पृथ्वीराज पाटील म्हणाले, की गेल्या चार दशकांपासून शेरीनाल्याचा विषय सोडवता आला नाही, ही लाज वाटण्यासारखी स्थिती आहे. राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना सांगलीकरांना शेरीनाला मिसळलेले पाण प्यावे लागतेय, हेही दुर्दैवच. महापालिका कितीवेळा अहवाल पे अहवाल खेळत बसणार आहे. या विषयाला तडीस नेण्यासाठी सांगलीकरांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. ते आम्ही करूच, मात्र आजघडीला नदीतील पाणी प्रदूषित झाले आहे, त्यावर तातडीचा उपाय करावा. पंप तात्काळ सुरु करावेत. नाल्याचे पाणी बंधाऱ्याच्या वर नदीत मिसळायचे थांबवावे. त्यासाठी सगळी यंत्रणा युद्ध पातळीवर वापरा, असे मी आयुक्त गुप्ता यांना आवाहन केले आहे.
पाटबंधारे विभागाशी चर्चेबाबत त्यांनी सांगितले, की कोयना धरणातून सध्या १०५० क्यूसेक विसर्ग असल्याचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितले. पाणी सांगलीत यायला वेळ लागू शकतो. त्यामुळे २१०० क्यूसेक विसर्ग करून नदीतील दुषित पाणी वाहते करणे गरजेचे आहे. त्यानंतर तातडीने सांगली बंधाऱ्यावर बरगे बसवावेत, अशी विनंती मी त्यांना केली आहे. यासाठी आम्ही दोन दिवसांची मुदत देऊ. त्यानंतर संघर्ष सुरु करावा लागेल.