पुणे पुस्तक महोत्सवाच्या पूर्वसंध्येला गिनेस विश्वविक्रम नोंदवण्यात आला आहे. या विश्वविक्रमासाठी पुस्तकांचा वापर करून सरस्वती चिन्ह साकारण्यात आले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी विश्वविक्रम नोंदवला गेल्याची अधिकृत घोषणा केली.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार चित्रा वाघ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष डॉ. मिलिंद मराठे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर, पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, कृष्णकुमार गोयल, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, डॉ. आनंद काटिकर,ॲड. मंदार जोशी, डॉ. संजय चाकणे, गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत अधिकारी प्रवीण पटेल, मिलिंद वेर्लेकर या वेळी उपस्थित होते. विश्वविक्रमी कलाकृतीसाठी नीलकंठ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक न्यास यांच्या पुस्तकांचा वापर करण्यात आला.
डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "चांगल्या गोष्टी होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. त्यानुसार सरस्वतीचे चित्र साकारून विश्वविक्रम नोंदवला जाणे महत्त्वाची बाब आहे. यंदाच्या निवडणुकीच्या काळात मी २५ कविता लिहिल्या. सांस्कृतिकनगरी असलेल्या पुण्यात असलेली विचारांची पोकळी पुस्तक महोत्सव, चर्चा होणे महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी घातली आहे. मुलांची दिशाभूल होणारे साहित्य मोबाईलवर येणार याची काळजी घेतली पाहिजे. केंद्र सरकार डीपफेकविरोधात कायदा करत आहे. मात्र, मुलांच्या मोबाईल वापराबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे."
विश्वविक्रमासाठीची कलाकृती किमान १ हजार चौरस मीटरची असणे, सुस्थितीत असलेल्या पुस्तकांचा वापर, जागा रिकामी न राहणे, पाच वेगवेगळे रंग असणे अशा विविध निकषांवर या कलाकृती मूल्यमापन करण्यात आले. त्यानुसार साकारलेली कलाकृती विश्वविक्रमासाठी पात्र ठरून विश्वविक्रम नोंदवला गेला आहे, अशी घोषणा प्रवीण पटेल यांनी केली.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "पुस्तक महोत्सवाच्यानिमित्ताने सरस्वतीचे पूजन करण्याचा मान मिळाल्याचा आनंद आहे. पूर्वी संदर्भासाठी पुस्तके वाचली जायची. आज तंत्रज्ञान हाताशी आहे. वाचनाने व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. त्यामुळे वाचन अत्यंत महोत्सव आहे. हा महोत्सव केवळ पुण्यात न करता त्याची चळवळ होण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये हा महोत्सव झाला पाहिजे. लोकांना वाचायला आवडते, त्यांना तसे मंच उपलब्ध करून दिले पाहिजे."
राजेश पांडे म्हणाले की, "पुणेकरांचे पुस्तकांवर किती प्रेम आहे हे पुणे पुस्तक महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून दिसून येते. यंदा पुस्तक महोत्सवाबरोबरच साहित्य, खाद्य, सांस्कृतिक महोत्सव, बालचित्रपट महोत्सव होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचा प्रारंभ सरस्वती यंत्राचा विश्वविक्रम नोंदवून होत आहे याचा आनंद आहे."
गेल्यावर्षीच्या महोत्सवात चार विश्वविक्रम नोंदवले गेले होते. यंदाच्या महोत्सवात पाच विश्वविक्रम नोंदवले जाणार आहेत, असे बागेश्री मंठाळकर यांनी सांगितले.