शरद पवारांनी दबाव टाकून साखर कारखाना होऊ दिला नाही : अजितराव घोरपडे

Admin
By -




        चांगला सुरू असलेला कवठेमहांकाळचा कारखाना आर. आर. पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला. त्यानंतर आम्ही कवठेमंकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर. आर. पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या, शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होवू दिला नाही.  त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले. आधी पिठाची चक्की ही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सद्विवेकबुद्धीने विचार करुन मतदान करा,  असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले..  
          महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगांव येथे आयोजित प्रचार सभेत घोरपडे सरकार बोलत होते.
       यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी उसाचा हंगाम सुरू झाल्यामुळे येणाऱ्या अडचणींचा पाढा सरकार व संजय काकांच्या समोर मांडला. सर्वच ग्रामस्थांनी कवठेमंकाळ तालुक्यात साखर कारखाना नसल्याची खंत व्यक्त केली. 
यावर अजितराव घोरपडे सरकार बोलताना म्हणाले,  कवठेमंकाळ साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडी मध्ये मी होतो. कारखाना सुरळीत  सुरू होता. मात्र हा कारखाना मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला गेला. मी शरद पवारांची भेट घेतली व हा कारखाना मल्टीस्टेट न करण्याची विनंती केली. त्यावर आर. आर. पाटील ऐकत नाहीत,  असे मला त्यांनी सांगितले. यावर कोण आर पाटील त्यांचा महांकाली कारखान्याशी काय संबंध ? असा प्रश्न विचारून मी पुन्हा एकदा मल्टीस्टेटमुळे होणाऱ्या तांत्रिक अडचणी पवार साहेबांसमोर मांडल्या. मात्र तरीही हा कारखाना मल्टीस्टेट करून त्यांनी बंद पडला.  
         त्यानंतर मी स्वतः साखर कारखाना करण्यासाठी पुढाकार घेतला. पूर्ण कागदपत्र पूर्ण करून त्याची फाईल सादर केली. ही गोष्ट करताना आर. आर. पाटलांनी या कामात खोडा घातला. शरद पवारांच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्याला दम देऊन आमच्या कारखान्याला लायसन मिळू दिले नाही. त्यामुळे आम्ही महाराष्ट्राचे नागरिक असून सुद्धा आम्हाला कर्नाटकमध्ये साखर कारखान्यासाठी जावे लागले, असेही ते म्हणाले.

          कवठेमंकाळ तालुक्याचे जर विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहण्याची भूमिका मतदारांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. सध्या पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर सुरू आहे. लोकांना विकत घेऊ शकतो, अशी भावना काही जणांची झालेली आहे. मात्र कवठेमंकाळ तालुक्यातला मतदार हा जागरुक व स्वाभिमानी आहे.  तो अशा पैसे फेकून मत विकत घेऊ पाहणाऱ्या प्रवृत्तीला बळी पडणार नाही, याचा मला विश्वास आहे. राष्ट्रवादी तीच आहे पण आता राष्ट्रवादीचा चेहरा आश्वासक आहे.
  खर बोलणारा व आपल्या बोलण्यावर ठाम राहणारा अजित पवार सारखा नेता आपल्याला मिळालेला आहे. त्यांच्या माध्यमातून कवठेमंकाळ  तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा ध्यास मी व संजय काका पाटील यांनी घेतला आहे.