शांतिनिकेतन कन्या शाळेत अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम

Admin
By -


    

  देवाच्या, धर्माच्या नावावर भोंदूबुवा लोकांची फसवणूक करीत असतात. त्यात स्त्रिया मोठ्याप्रमाणात बळी पडतात. त्यामुळे मुलींनी लहानपणापासूनच अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे, असे मत सांगली अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याध्यक्षा व माजी नगरसेविका ज्योती आदाटे यांनी व्यक्त केले.
         




शांतिनिकेत येथील कन्या शाळेच्यावतीने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अंतर्गंत आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. शाळेच्या मुख्याधिपिका समिधा पाटील अध्यक्षस्थानी होत्या. ज्योती आदाटे म्हणाल्या, समाजामध्ये भोंदूबुवा हे देव अंगात येणे, भुताने झपाटणे याच्या आधारे लोकांचे शोषण करतात. स्त्रियांचे लैंगिक शोषणाच्याही घटना घडत आहेत. त्याला स्त्रिया बळी पडतात. त्यामुळे स्त्रियांनी अशा अंधश्रद्धांपासून दूर राहिले पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच मुलींवर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे संस्कार केले पाहिजे. अनेक मंदिर, दर्ग्यामध्ये अंगात येणे, भूताने झपाटण्याच्या नावाखाली स्त्रियांना मारहाण केली जाते. अनेकांची आर्थिक शोषणही केले जाते. अशा अंधश्रद्धांच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी जादूटोणाविरोधी कायदा करण्यासाठी आग्रह धरला. शेवटी त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतर हा कायदा करण्यात आला. या कायद्याच्या आधारे आता अंनिस भोंदूबुवांवर खटले दाखल करीत आहे. अंनिसच्यावतीने दाखल केलेल्या खटल्याचा निकाल लागून सांगली जिल्ह्यातील भोंदूबुवाला पहिली शिक्षा झाली. त्यामुळे अशा भोंदूबुवांविरोधात तक्रारी करण्यासाठी लोकांनी आता स्वत:हून पुढे आले पाहिजे. आदाटे यांनी यावेळी नारळातून अग्नी निर्माण करण्याचा चमत्कार करून दाखविला. यावेळी अंनिसचे गणेश मानस यांनी पेटता कापूर खाणे, जिभेतून तार आरपार करणे, मंत्रशक्तीने वस्तू गोड करणे, टोकदार खिळ्यांवर झोपणे असे चमत्काराचे प्रयोग सादर केले.
         यावेळी मुख्याध्यापिका समिधा पाटील यांनी मुलींनी अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त होऊन वैज्ञानिक दृष्टीकोनाची कास धरावी.         शांतिनिकेतनमध्ये प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या संस्कारातून घडलेले अनेक विद्यार्थी आज लढाई करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक महंमदरफिक मुल्ला यांनी आभार मानले. ए. एस. धुमाळ, आर. एस. बागडी यांनी संयोजन केले.