तुकाराम बाबांसह ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव

Admin
By -




जत-माडग्याळ-अंकलगी म्हैसाळ बंदिस्त पाईपलाईनचे काम सुरू झाल्यानंतर कामाची पाहणी करून हभप तुकाराम बाबा महाराज व ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला.

   जत तालुक्यातील मायथळहुन माडग्याळ तलावात व त्यानंतर माडग्याळहुन व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी तलावात म्हैसाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले असून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली आहे.
         लसदरचे काम सुरू करण्यासाठी मशीन माडग्याळ येथे दाखल होताच सोमवारी दुपारी तुकाराम बाबा व ग्रामस्थांनी भेट देत प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे की नाही याची पाहणी केली. काम सुरू झाल्याचे पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचे पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
       यावेळी अंकलगीचे माजी सरपंच मोहन गायकवाड, सोर्डीचे सरपंच तानाजी पाटील, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, डॉ. रविकिरण म्हेत्री महातेश स्वामी, सलीम अपराध, बसवराज बिराजदार, गगय्या स्वामी, महेश भोसले, चनप्पा आवटी, नारायण कोरे, संजय हदीमणी, संतोष पाटील, अनिल उदगेरी, महेश सूर्यवंशी, उमराणी, बिराण्णा कोहळळी, कन्याकुमार हत्ताळी, प्रशांत भगरे, सचिन कुकडे, शिवलिंगप्पा तेली, काशीराया रेबगौंड यांच्यासह बागडेबाबा मानव मित्र व पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

          जत पूर्व भागात म्हैसाळचे पाणी दाखल व्हावे यासाठी २०१९ पासून तुकाराम बाबा यांनी पाणी परिषद, मुंबई मंत्रालय पायी दिंडी, मोर्चे, उपोषण, रस्ता रोको, रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन केले. सोमवारी माडग्याळ येथे दाखल झालेले म्हैसाळचे पाणी माडग्याळहुन व्हसपेठ, गुडडापूर, अंकलगी तलावात सोडावे यासाठी आंदोलन केले. याच मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वी अंकलगी येथे आंदोलन केले होते. बाबांच्या या मागणीचे दखल घेत या मार्गावरील काम सुरू करण्यात आले आहे. तसे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.
          अधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलनवेळी काम सुरू करत असल्याचे सांगितले होते. आंदोलन होताच तुकाराम बाबासह आंदोलनकर्त्यांनी प्रत्यक्ष मशीन आली आहे का, काम सुरू केले आहे का याची पाहणी केली. जेथून काम सुरू होणार आहे तेथे जावून  कामाची पाहणी करण्यात आली. हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या आंदोलनाला यश आले आहे.